१८ परवाने निलंबित, ४ आस्थापनांचा व्यवसाय बंद; ३७.५० लाखांचा अन्नसाठा जप्त
FDA Raid Adulteration Maharashtra: सणासुदीच्या काळात मिठाई, सुकामेवा, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांमधील वाढती भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर धडक मोहीम राबवली आहे. या व्यापक कारवाईत राज्यातील १८ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ४ आस्थापनांचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच तपासणीदरम्यान सुमारे ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १६ लाख ८७ हजार रुपयांचा साठा जप्त करून तिघांना अटकही करण्यात आली आहे.
एफडीएच्या पथकांनी ३ नोव्हेंबर रोजी पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांत मिठाई उत्पादक, सुकामेवा विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ, फरासान, मसाले आणि खाद्यतेल विक्रेत्यांच्या आस्थापनांची कसून तपासणी केली. यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि पॅकेजिंग लेबलिंगमधील त्रुटी आढळून आल्या.
विभागांनुसार झालेली कारवाई
पुणे विभाग: सर्वाधिक ६ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ५ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग: ५ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
अमरावती विभाग: २ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले.
सुकामेवा आणि इतर साठ्यावर धडक कारवाई
सुकामेव्याच्या बाबतीतही राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. सांगलीतील वसंतदादा मार्केट यार येथील आदर्श ट्रेडर्सकडून ७४९ किलो बदाम जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ८ लाख ९८ हजार ८०० रुपये आहे. तसेच कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील विनायक ट्रेडिंगकडून १२८ किलो काजू व काजू कणी जप्त करण्यात आली असून, या साठ्याची किंमत ७९ हजार ९७० रुपये आहे. याशिवाय सांगली, आष्टा, तासगाव, रत्नागिरी, नवी मुंबई आणि इतर ठिकाणीही फरासान, मिठाई, मसाले, तूप व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानम मसाला आणि सुवासिक तंबाखूविरोधातही एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. कोकण आणि पुणे विभागात दोन ठिकाणी छापे टाकून १६ लाख ८६ हजार ९१० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.













