नगरसेवक सौरभ मलुष्टे आयोजित ‘भव्य रांगोळी उत्सव – पर्व ३’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रभाग क्र. ५ व ६ मधील ८२ महिलांचा सहभाग; रांगोळीच्या माध्यमातून दिला ‘पाणी जपून वापरा’ असा सामाजिक संदेश

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त आयोजित ‘भव्य रांगोळी उत्सव – पर्व तिसरे’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. कला, सहभाग आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम ठरलेल्या या रांगोळी महोत्सवात प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील तब्बल ८२ महिलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.

रांगोळीतून दिला जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश :

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन, प्रत्येक रांगोळीखाली “पाणी जपून वापरा, पाण्याची काटकसर करा” हा संदेश लिहिण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सहभागी महिलांनी आपापल्या कल्पकतेतून आणि देखण्या रांगोळ्यांमधून जलसंवर्धनाचा अत्यंत प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

Kokan camp

घरीच रांगोळी काढण्याची मुभा ठरली जमेची बाजू :

दिवाळीच्या सणात घरातील फराळ, स्वच्छता व पाहुण्यांची लगबग लक्षात घेऊन आयोजकांनी ही स्पर्धा महिलांच्या सोयीनुसार ठेवली होती. महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरासमोरच रांगोळी काढण्याची मुभा होती. नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि परीक्षकांच्या पथकाने स्वतः प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन रांगोळ्यांचे थेट जागेवर जाऊन परीक्षण केले. घरातून बाहेर न पडता सणाच्या धावपळीतही स्वतःच्या कलागुणांना वाव मिळाल्याने, अगदी शालेय विद्यार्थिनींपासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठ आजींपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते परीक्षण व गौरव :

या स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे कौतुक करत त्यांना ‘प्राविण्य’ आणि ‘विशेष प्राविण्य’ अशा दोन गटांमध्ये विभागून आकर्षक प्रशस्तीपत्रक व खास भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

सामाजिक जाणीव जपणारा उत्सव :

केवळ सण साजरा न करता त्यासोबत जलजागृतीसारखा अत्यंत गंभीर विषय जोडून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे प्रभागातील नागरिकांकडून आणि महिला भगिनींकडून भरभरून कौतुक केले जात आहे.