ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध; विहित मुदतीत दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन वितरणात येऊ शकते अडचण
Ratnagiri Pensioners Life Certificate Submission: राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आपला ‘हयात दाखला’ (Life Certificate) सादर करणे बंधनकारक आहे. रत्नागिरी जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेत असलेल्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी आपले हयातीचे दाखले आगामी ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करावेत, असे आवाहन अपर कोषागार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी व सुलभतेसाठी प्रशासनाकडून विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने हयात दाखला सादर करता येईल:
हयात दाखला सादर करण्याचे विविध पर्याय
बँकेत प्रत्यक्ष जाऊन: आपले निवृत्तीवेतन खाते असलेल्या मूळ बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन बँक अधिकाऱ्यांसमोर हयातीच्या दाखल्यावरील यादीतील नावामोर स्वाक्षरी करून हयात दाखला नोंदवता येईल. तसेच विहित नमुन्यातील हयातीचा दाखला बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याची (Gazetted Officer) स्वाक्षरी घेऊन जिल्हा कोषागार कार्यालयात थेट सादर करता येतो.

‘जीवन प्रमाण’ पोर्टलद्वारे ऑनलाइन: [https://jeevanpramaan.gov.in](https://jeevanpramaan.gov.in) या अधिकृत पोर्टलवरून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल हयात दाखला (DLC) ऑनलाइन पद्धतीने सशुल्क नोंदवता येऊ शकतो.
स्मार्टफोन ॲपद्वारे: अँड्रॉइड किंवा आयओएस (iOS) स्मार्टफोनवर ‘जीवन प्रमाण’ ॲप डाउनलोड करून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हा दाखला सादर करण्याची सोय उपलब्ध आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB): भारतीय डाक विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ मार्फत पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरपोच डिजिटल हयात दाखला नोंदवता येतो.
परदेशात वास्तव्य असल्यास: काही कारणान्वये परदेशात वास्तव्य असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय दूतावासाच्या (Indian Embassy) अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणित करून दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठवता येतो.
वेळेत हयातीचा दाखला सादर न केल्यास निवृत्तीवेतन वितरणात अनावश्यक अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपले दाखले नक्की सादर करावेत, असे आवाहन कोषागार प्रशासनाने केले आहे.













