ज्येष्ठ व्यापारी दादा वणजू व गणेश भिंगार्डे यांची संकल्पना; कार्तिकी एकादशीपर्यंत राहणार रोषणाई, बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची अलोट गर्दी
रत्नागिरी : दिवाळी सणाच्या मंगल पर्वावर रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ रंगीबेरंगी आणि मनमोहक विद्युत रोषणाईने अक्षरशः उजळून निघाली आहे. राम आळी, विठ्ठल मंदिर परिसर ते धनाजी नाका या प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या झगमगत्या रोषणाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत सणासुदीच्या उत्साहात भर पडली असून सर्वत्र दिवाळीचे मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ व्यापारी दादा वणजू व गणेश भिंगार्डे यांची अभिनव संकल्पना :
रत्नागिरीतील ज्येष्ठ व्यापारी दादा वणजू आणि रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांच्या संकल्पनेतून ही नेत्रदीपक विद्युत रोषणाई साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ राम आळी भागातीलच नव्हे, तर शहरातील इतर भागांतील व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला मनापासून पाठिंबा देत खर्चात खारीचा वाटा उचलला आहे. सर्व स्थानिक व्यापाऱ्यांच्या एकजुटीतून साकारलेली ही रोषणाई व्यापारी आणि ग्राहकांमधील बंध अधिक दृढ करणारी ठरत आहे.

कार्तिकी एकादशीपर्यंत राहणार झगमगाट :
दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली ही आकर्षक रोषणाई आगामी कार्तिकी एकादशीपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. सायंकाळ होताच लखलखणाऱ्या दिव्यांच्या माळांमुळे बाजारपेठेचे रूपडे पूर्णपणे पालटून जात असून नागरिकांचे डोळे दिपवून टाकत आहे.
खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची झुंबड :
दिवाळी खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीच्या बाजारपेठेत ग्राहकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. कपडे, पूजा साहित्य, आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य आणि फराळाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या उत्साहाला या देखण्या विद्युत रोषणाईमुळे नवा बहर आला आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि बाजारपेठेतील हा झगमगाट पाहून स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पसरले आहे.













