Mandangad Water Supply Namo Udyan Bhoomipujan: मंडणगडच्या ४२ कोटींच्या नळपाणी योजना व नमो उद्यानाचा १० नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा

Mandangad Water Supply Namo Udyan Bhoomipujan: मंडणगडच्या ४२ कोटींच्या नळपाणी योजना व नमो उद्यानाचा १० नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा; शिवसेनेची पत्रकार परिषद संपन्न

Mandangad Water Supply Namo Udyan Bhoomipujan: राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेसह नमो उद्यानाचा भूमिपूजन समारंभ अत्यंत दिमाखात संपन्न होणार आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण विकासकामांच्या भूमिपूजनाची सविस्तर माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (५ नोव्हेंबर) मंडणगड पंचायत समितीच्या सभापती दालनात एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सभापती सौ. प्रणाली चिले, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, जितेंद्र दवंडे, नगरसेवक सुभाष सापटे, आदेश मर्चंडे, निलेश सापटे, योगेश जाधव, नगरसेविका सेजल गोवळे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, नम्रता पिंपळे, इरफान बुरोंडकर, सिद्धेश देशपांडे, निलेश गोवळे, आकाश सापटे, शैलेश शिगवण, भुपेन बोर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक विकास सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

चाळीस वर्षांची पाणीसमस्या अखेर मार्गी
पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर म्हणाले की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पक्षप्रमुख तसेच शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंडणगड शहराची गेल्या चाळीस वर्षांपासूनची प्रलंबित पाणीसमस्या मार्गी लागण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. या भूमिपूजन सोहळ्यास राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार असल्याने विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या मंडणगड तालुक्याच्या इतिहासात या दिवसाची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले.

Arihant 2

४२ कोटींची नळपाणी योजना आणि नमो उद्यानाची पर्वणी
शिवसेना शहरप्रमुख तथा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, साडेचार वर्षांपूर्वी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याचे जे आश्वासन देण्यात आले होते, त्यानुसार नगरपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ४२ कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजूर करून आणण्यात यश आले आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कृष्णानगर येथे एक कोटी रुपये खर्चाचे नमो उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे मंडणगड शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून, दीर्घकाळापासून प्रलंबीत असलेल्या नागरिकांच्या प्रतीक्षेला यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नगरसेविका सेजल गोवळे आणि नगरसेवक सुभाष सापटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत राज्य शासनाचे आभार मानले.