जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेत शेतकऱ्यांचा पुढाकार; सकाळच्या दवावर पिके येण्याची आशा
Makhajan Rabi Season Sowing: संगमेश्वर तालुक्यातील माखजन व परिसरात मागच्या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह बरसलेल्या परतीच्या पावसाचा मोठा फायदा कोकणातील रब्बी हंगामाला (Rabi Season) होणार आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतजमिनी चांगल्या प्रकारे ओल्या झाल्या असून, या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे.
कोकणात परतीचा पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलसरपणा असताना पेरणी केली, की पीक उगवून आल्यानंतर हिवाळ्यात सकाळी पडणाऱ्या दवाच्या जीवावर रब्बीची पिके उत्तम तऱ्हेने येतात. हा पारंपरिक अनुभव विचारात घेऊन बळीराजाने पेरणीच्या कामाला गती दिली आहे.
परतीच्या पावसाने दिला दिलासा
यावर्षी गणेशोत्सवापूर्वीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी पूर्णपणे सुकल्या होत्या. परिणामी, यंदा रब्बी हंगामाची पेरणी कशी करायची आणि पीक येईल का, या विचाराने शेतकरी पेरणी करण्यास कचरत होते. मात्र, मागच्या आठवड्यात सलग दोन ते तीन दिवस झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे जमिनींमध्ये पुन्हा चांगला ओलावा निर्माण झाला आहे.

या ओलाव्याचा तातडीने फायदा घेत शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे आधुनिक ट्रॅक्टर उपलब्ध असल्याने पेरणीची कामे अत्यंत अल्पावधीत आणि वेगाने पूर्ण होण्यास मोठी मदत होत आहे. आता येत्या काळात दव किती प्रमाणात पडते आणि पिकांची वाढ कशी होते, हे पूर्णपणे निसर्गाच्या हवामान बदलांवर अवलंबून असणार आहे.













