Maharashtra Govt Festival Advance: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता २० हजारांचे सण अग्रिम!

Maharashtra Govt Festival Advance: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता २० हजारांचे सण अग्रिम!

४,८०० रुपयांपर्यंत ग्रेड वेतन असलेल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; वित्त विभागाकडून शासन निर्णय जारी

Maharashtra Govt Festival Advance: राज्यातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने सण अग्रिमची (Festival Advance) मर्यादा वाढवून २० हजार रुपये केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे दिवाळीसह विविध १० सणांच्या निमित्ताने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या वित्त विभागाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा सविस्तर शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यानुसार, १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनामधील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा पात्र कर्मचाऱ्यांना आता २० हजार रुपयांचे सण अग्रिम अनुज्ञेय राहणार आहे.

या निर्णयाचा लाभ स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या राष्ट्रीय सणांसह दिवाळी, रमजान ईद, नाताळ, पारशी नववर्ष, संवत्सर, रोश होशनाह (यहुदी नववर्ष) आणि बुद्ध जयंती यांसारख्या विविध सणांसाठी घेता येणार आहे. तसेच, सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या इतर सणांसाठीही ही सण अग्रिमची सुविधा लागू राहणार असल्याची माहिती शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

Shoping fiesta

सण अग्रिम मंजूर करण्याच्या आणि त्याची वसुली करण्याच्या अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच ५ नोव्हेंबर २०२६ पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. वित्त विभागाचे उपसचिव रविकुमार लगनवाड यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात वाढीव अग्रिमाचा लाभ घेता येणार आहे.