Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या भेटीला गौतम अदानी, ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन विचारपूस..

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या भेटीला गौतम अदानी, ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन विचारपूस..

ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फोनवरून विचारपूस, राजकीय वर्तुळात भेटीगाठींचे सत्र

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासांतच त्यांची तब्येत अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने पुन्हा उपचारासाठी आणण्यात आले. सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या (Medical Tests) केल्या जात असून त्यांची प्रकृती आता स्थिर आणि सामान्य असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या रुग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. याशिवाय राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन शरद पवार यांच्या तब्येतीची माहिती घेतली. उद्योगपती गौतम अदानी यांनीही आज सकाळीच ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचून शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

राजकीय वर्तुळात भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण
शरद पवार रुग्णालयात असतानाच राजकीय नेत्यांच्या भेटीचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी रात्रीच रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यात काही वेळ संवादही झाला. त्यापाठोपाठ आज सकाळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली.

Arihant 3

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही अंतर्गत निर्णय वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता पार्थ पवार घेत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात घेतलेली भेट राजकीय दबावतंत्राचा भाग असल्याचे बोलले जात असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.