शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय सत्र पार पडले; नाविन्यपूर्ण कल्पनांना शासन देणार प्रोत्साहन
Seva First Innovation Challenge Ratnagiri: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘Seva First Innovation Challenge 2026’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३९ स्पर्धकांनी स्थानिक समस्यांवर आधारित आपल्या नवनवीन कल्पना व प्रकल्प सादर केले आहेत.
रत्नागिरी येथील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात या जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. "स्थानिक समस्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाईल. तरुणांनी आपल्या या कल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा," असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याप्रसंगी केले.
विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचे तज्ज्ञांकडून परीक्षण
या सादरीकरण सत्रात कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, संशोधन आणि नावीन्यपूर्ण विकास अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रांशी निगडित ३९ प्रकल्पांचे सादरीकरण व सखोल परीक्षण करण्यात आले. यासाठी शासकीय व तांत्रिक क्षेत्रातील ९ तज्ज्ञ परीक्षकांचे मंडळ नियुक्त करण्यात आले होते. या मूल्यांकनातून सर्वोत्तम ठरणाऱ्या संकल्पनांची निवड करून संबंधित उमेदवारांना शासनातर्फे गौरविण्यात येणार असून त्यांना प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.

तज्ज्ञ परीक्षक मंडळ
या सादरीकरण सत्रात मुख्य परीक्षक म्हणून खालील अधिकाऱ्यांनी व प्राध्यापकांनी कामगिरी बजावली:
मनोज पाटणकर (महिला व बालविकास अधिकारी)
प्रतीक पाटील (कृषी उपसंचालक)
एन. एम. शिंदे (माध्यमिक शिक्षणाधिकारी)
संकेत कदम (उद्योग अधिकारी)
ऋषिकेश जाधव (पुरवठा निरीक्षक)
प्रतीक पेठकर (डीआयटी प्रतिनिधी)
प्रा. चंद्रशेखर जाधव
प्रा. एम. एन. तगारे (फिनोलेक्स कॉलेज)
प्रा. श्रीकृष्ण मस्के (शासकीय तंत्रनिकेतन)













