Nana Patole on Tree Felling & Phone Tapping: अदानी पॉवर प्लांट मार्गिकेसाठी ५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार; नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

Nana Patole on Tree Felling & Phone Tapping: अदानी पॉवर प्लांट मार्गिकेसाठी ५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार; नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

Nana Patole यांचे भाजप सरकारवर जोरदार हल्लबोल; फोन टॅपिंग प्रकरणावरून रश्मी शुक्लांवर ताशेरे तर निवडणूक आयोगाच्या कारभारावरही उपस्थित केले प्रश्न

गोंदिया: Nana Patole एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील अदानी पॉवर प्लांट ते रायपूरपर्यंत जाणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात तब्बल ५ हजार १५२ झाडांची कत्तल होणार आहे. या वृक्षतोडीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. अल निनोचा प्रभाव म्हणजे भाजपचे पाप असल्याचे सांगत त्यांनी गोंदियात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशभरात अंदाधुंद जंगलतोड करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वनसंपदेच्या ऱ्हासामुळे पर्यावरणीय संकट वाढत असून, पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत असल्याचे पटोले म्हणाले. देशातील संपत्ती अदानींच्या हाती सोपवण्याचा भाजप सरकारचा मानस असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, रायपूर-तिरोडा वीजवाहिनी प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे संभाव्य परिणाम यांचा मुद्दा यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माझा फोन ‘गब्बरसिंग’ नावानं टॅप केलाय: नाना पटोले
भंडाऱ्याच्या साकोलीत नाना पटोले मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी मिलन आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार अभिजीत वंजारी यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना पटोलेंनी खळबळजनक आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांनी माझा फोन टॅप केल्याचा आरोप करतानाच, तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. ज्याप्रमाणे देशद्रोह्यांचे फोन टॅप केले जातात, अगदी त्याचप्रमाणे माझा फोन तत्कालीन अधिकारी रश्मी शुक्ला यांनी ‘गब्बरसिंग’ या नावाने टॅप केला होता, असा दावा त्यांनी केला. सत्तेसाठी राजकारण्यांनी अत्यंत खालची पातळी गाठल्याचे ते म्हणाले.

Pednekar sankul

निवडणूक आयोग आणि प्रशासनावर टीका
यावेळी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अभिजीत वंजारी हे ईव्हीएम मशीनवर नाही, तर बॅलेट पेपरमुळेच निवडून आले आहेत, असा दावा करत त्यांनी, "सरकारचा जीव पोपटात असून, हा पोपट म्हणजे निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार आहेत. जोपर्यंत या पोपटाला मारले जाणार नाही, तोपर्यंत असाच प्रकार सुरू राहील," असा घणाघाती आरोप केला. या सोहळ्यात बोलताना नवनियुक्त आमदार अभिजीत वंजारी यांनीही, निवडणुकीच्या काळात आपले व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करून बंद पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून झाला होता, असा गंभीर आरोप केला.