उत्तर प्रदेशातील चालकाविरुद्ध कारवाई
लांजा: Veral Ghat Reckless Driving या प्रकरणाअंतर्गत मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात भरधाव आणि बेदरकारपणे ट्रेलर चालवून वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामविजय राम अवध सिंह (वय ५१, रा. उत्तर प्रदेश) असे या संशयित चालकाचे नाव आहे.
ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास वेरळ घाटात घडली. संशयित चालक आपल्या ताब्यातील ट्रेलर (क्र. एमएच ४३ बीपी १६९८) मुंबई-गोवा महामार्गावरून घेऊन जात असताना अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवताना आढळून आला. त्याच्या या बेदरकार वाहन चालवण्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची तसेच गंभीर दुखापत किंवा नुकसान होण्याची दाट शक्यता होती.
या घटनेची गंभीर दखल घेत लांजा पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.














