क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी घेतली ग्रामस्थांसोबत बैठक; रस्त्याच्या कामासह इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
माखजन: Kadwai Railway Station Issues या विषयावर संगमेश्वर तालुक्यातील कडवई रेल्वे स्थानकातील प्रलंबित समस्यांबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी नुकतीच कडवई रेल्वे स्थानकाला भेट देत ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तब्बल नऊ वर्षे सातत्याने पाठपुरावा आणि संघर्ष केल्यानंतर कडवई रेल्वे स्थानकाची उभारणी झाली. मात्र, स्थानक सुरू होऊन पाच वर्षे उलटली तरी प्रवाशांच्या मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. स्थानकावर फलाट नसल्याने प्रवाशांना गाडीत चढताना आणि उतरताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच केवळ एकच पॅसेंजर गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे आणि स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन दिले होते. यामध्ये कडवई स्थानकावर फलाट बांधणे, दिवा-सावंतवाडी गाडीला थांबा देणे, स्थानकाकडे जाणा-या रस्ता सुस्थितीत करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे रस्त्याची दुरवस्था दूर न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेनेही दिला होता.

रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासने
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आणि ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी रस्त्याच्या कामाला मंजुरी घेण्यात आली असून महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन बापट यांनी दिले. तसेच दिवा-सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा आणि फलाटाचे काम मार्गी लागावे, यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्थानक परिसरातील झाडीझुडपे हटवणे यांसारख्या आपल्या अखत्यारितील समस्या तातडीने सोडवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीमुळे कडवई रेल्वे स्थानकाच्या समस्या मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी उतरतात, याकडे आता कडवईसह परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीत कडवईचे गावकर श्रीपत ओकटे, तंटामुक्त अध्यक्ष अशोक उगगावकर, पोलीस पाटील संजय ओकटे, तुरळचे सरपंच रामचंद्र हरेकर, चोबरवाडीचे गावकर रघुनाथ येलोंडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, उपाध्यक्ष संदीप चिले, सचिव मोहन ओकटे, सहसचिव संदीप येलोंडे, सहखजिनदार राजेंद्र येलोंडे, मनसेचे नंदकुमार फडकल, प्रकाश धामनाक, मोहन कुंभार यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













