चिपळूणमधील रविकांत आवलेंनी २२ दिवसांत सायकलने केला २ हजार ४०० किमी प्रवास

चिपळूण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ७२८ वी संजीवन समाधी, शिख धर्मगुरू संस्थापक श्री गुरू नानकदेव यांची ५५५ वी जयंती तर संत नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती अशा त्रिवेणी योगावर आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर ते घुमान (पंजाब) रथ व सायकल सवारी यात्रेत कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील रविकांत आवले यांनी सायकल सवारीत सहभाग घेतला अणि २२ दिवसांत २ हजार ४०० कि.मी. अंतराचा प्रवास केला.

ही सायकल सवारी व रथयात्रा संत नामदेव महाराजांच्या जयंती म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी पंढरपूरमधून सुरू झाली. प्रवास काळात ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा व गुरू नानकदेव यांची जयंती यात्रेतील सहभागींनी साजरी केली.

‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भारतभर भ्रमण करीत पंजाब येथील घुमान येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. समकालीन असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी संतश्रेष्ठ तुकाराम तसेच नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या माध्यमातून देशभरासह जगाला शांती, समता, बंधूत्वाचा विचार देण्यासाठी प्रसार आणि प्रचार केला. त्याच प्रचार व प्रसारासाठी नामदेव महाराजांनी पंजाबमधील घुमानमध्ये वास्तव्य करून ‘ज्ञानदीप लावू जगी..’ म्हणत कीर्तनाच्या माध्यमातून शांती, समता, बंधूता जनतेच्या मनात रूजविली. आजही पंजाब येथील घुमानमध्ये तसेच पंजाबवासीयांच्या मनात बाबा नामदेव यांच्याविषयी मोठा आदर आहे. गुरूग्रंथ साहीबमध्येही नामदेवांच्या ओव्यांचा समावेश आहे. गेली चार वर्षे पंढरपूर ते घुमान अशा रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायासह अनेकजण सहभागी होतात. या वेळेच्या यात्रेत शंभरहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.

त्यामध्ये चिपळूणमधील रविकांत आवले यांनीदेखील सहभाग घेतला. सुमारे २ हजार ४०० कि.मी. अंतराचा प्रवास सायकलच्या माध्यमातून बावीस दिवसांत करून राज्यातील ज्ञानेश्वर, तुकाराम व पंजाबमधील गुरू नानकदेव अशा संतश्रेष्ठांचा शांती, समता, बंधूता या विचारांच्या प्रचाराची पताका हाती घेतली. प्रवासादरम्यान सुरुवातीला महाराजांची जयंती पंढरपूरमध्ये साजरी झाल्यावर गुरू नानकदेव यांची जयंती व त्यानंतर पंजाबमधील घुमान येथे ही यात्रा पोहोचली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 14/Dec/2024