गुहागर : तत्कालीन एन्रॉन कंपनीच्या काळात झालेल्या शृंगारतळी- वेलदूर मार्गावरील रस्त्याला अक्षरशः खड्ड्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शृंगारतळी ते पालपेणे दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गाची डागडुजी व्हावी, अशी मागणी होत आहे. तत्कालीन एन्रॉन (आताची आरजीपीपीएल) कंपनीच्या काळात हा रस्ता धोपावे, वेलदुर, नवानगर, अंजनवेलकडे जाणारा हा मार्ग एन्रॉन कंपनीमुळे रुंद व दर्जेदार बनविला गेला. या मार्गावरून कंपनीमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एन्रॉन कंपनीने त्यावेळी मजबूत रस्ता बनविला. त्यामुळे अनेक वर्षे हा रस्ता अतिशय चांगल्या स्थितीत होता. एन्रॉन कंपनी बंद पडल्यानंतर आरजीपीएल कंपनी आजतागायत सुरू आहे. मात्र, कंपनीकडे जाणारा सध्या खड्डेमय बनला आहे. शृंगारतळी ते पालपेणे दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून विद्यार्थी वर्ग, कामगार, प्रवासी व वाहनचालक यांना डोकेदुखीचे ठरले आहे. या गावांसाठी शृंगारतळी बाजारपेठ ही मध्यवर्ती आणि मोठी असल्याने येथून कायम प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा अशी मागणी प्रवासी वर्ग व वाहनचालकांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 16/Dec/2024














