मराठीतील चांगले साहित्य वाचणे आवश्यक : अॅड. विलास कुवळेकर

लांजा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही नक्कीच आनंदाची बाब आहे; पण मराठीचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही. चांगले साहित्य वाचले पाहिजे, चांगल्या मराठीत बोलले पाहिजे. तरच पुढच्या पिढ्यांवरही त्या संस्कारांचे बिजारोपण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी केले. लोकमान्य वाचनालयातील कार्यक्रमात ते बोलत होते.

‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानी होते. येथील लोकमान्य वाचनालयात हा समारंभ पार पडला. लोकमान्य वाचनालय या कार्यक्रमाचे सहआयोजक होते. अॅड. कुवळेकर म्हणाले, कोणतीही भाषा चांगलीच असते. पण, जिला आपण आपली भाषा म्हणतो, त्या भाषेतील आपण काय वाचतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. लेकरांनीच आपल्या आईचा गौरव करायला पाहिजे, असे म्हणाले.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. वाचनालयातर्फे विजय बेर्डे यांनी आपले विचार मांडले. प्रमोद कोनकर यांनी स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. लेख स्पर्धेचे परीक्षण केलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, स्पर्धेतील विजेते बाबू घाडीगावकर आणि विराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेश केसरकर, विनोद बेनकर, विजयालक्ष्मी देवगोजी, जयराज मांडवकर आदी उपस्थित होते. लेख स्पर्धेतील बाबू घाडीगावकर, विराज चव्हाण तसेच चित्रकला स्पर्धेतील सुयोग रहाटे, साहिल मोवळे या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. लेख स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्वानंदी जोगळेकर यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी पारितोषिक स्वीकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय हटकर यांनी तर आभार अनिकेत कोनकर यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 16/Dec/2024

Ratnagiri Khabardar add image