राजापूर पं.स.च्या नव्या इमारतीचा प्रश्न सुटणार..

राजापूर : राजापूर तालुका पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागांची कार्यालये एकाच छताखाली यावीत याकरिता नव्या इमारतीचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. आता नवनिर्वाचित आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी या प्रकरणी लक्ष घातले असून, पंचायत समिती अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या प्रस्तावाबाबत माहिती घेतली. पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.

राजापूर तालुक्यात २१८ गावे असून १०१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीचे पालकत्व करणाऱ्या पंचायत समितीचा कारभार ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेल्या इमारतीमधून हाकला जात आहे. ही इमारत सुमारे ६ हजार २४८ चौरस फूट आकाराची असून, ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर आहे. सद्यस्थितीत या इमारतीत शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कार्यालये आहेत. मात्र, पंचायत समितीशी संलग्न असलेली एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनिक बांधकाम आदींची कार्यालये मात्र अन्य इमारतींमध्ये आहेत.

पंचायत समितीची सर्व कार्यालये एकाच इमारतीत यावीत, याकरितासुमारे बारा-तेरा वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे नव्या इमारतीचा आराखडाही पाठविण्यात आला होता. मात्र, ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असल्याने नव्या इमारतीला अडसर ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या नावे असलेल्या जागेमधील २२ गुंठे जागा आपल्याला सोडण्यात यावी, अशी अट घालत प्रस्ताव सादर केला. सध्या पंचायत समितीच्या ताब्यात ११० गुंठे जागा (सर्व्हे नं. ४२ व १) असून, यामधील २२ गुंठे जागा सार्वजनिक बांधकाम विभाग, १६ गुंठे जागा गोडावूनसाठी म्हणजेच महसूल विभागाला देण्यात येणार आहे.

त्रुटींची पूर्तता करून शासनाकडे प्रस्ताव
पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावामुळे या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली; मात्र त्रुटी असल्याने संबंधित प्रस्ताव त्रुटी पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून दिला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून देत त्रुटी पूर्ण करण्याचे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने
त्रुटीची पूर्तता करीत ऑगस्ट २०२३ मध्ये प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविला. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 16/Dec/2024