चिपळूण : चतुर्थ श्रेणी सर्वेक्षण अंतर्गत शहरातील सदनिकाधारक व व्यापारी यांच्या भरमसाट वाढलेल्या घरपट्टी कराविरोधात शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याची दखल घेत गुरुवार, दि. १९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चिपळूण नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकारी यांच्याशी वाढीव घरपट्टी कराबाबत पूर्णतः शंका निरसन होईपर्यंत वाढीव घरपट्टी कराबाबत प्रशासनाने करधारकांवर कारवाई करू नये, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदार करदात्यांच्या कर आकारणीचे फेर सर्वेक्षण केले जाईल, असे सांगितले.
वार्षिक चतुर्थ श्रेणी सर्वेक्षणानंतर शहरातील मालमत्ताधारकांच्या कर रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत जनतेतून तीव्र नाराजीसह उठाव सुरू झाला आहे. या विषयी सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची बाजू घेत नगरपरिषदेवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटानेही नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी आ. रमेश कदम, पक्षाचे सरचिटणीस प्रशांत यादव, शहर अध्यक्ष रतन पवार, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी नगरसेवक राजेश कदम, सीमा चाळके आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी कदम व यादव यांनी, नागरिकांमध्ये वाढलेल्या करांविषयी प्रचंड संतप्त भावना आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या बाबत संपूर्ण कर आकारणीच्या नियोजनानुसार फेर सर्वेक्षण करावे.
त्याचबरोबर सदनिकाधारकांच्या सर्वेक्षणातून घरातील स्वच्छतागृहाचे क्षेत्रफळ, त्या ठिकाणच्या पॅसेजचे क्षेत्रफळ, देवघर, घरातील अंतर्गत जिन्यातील जागेच क्षेत्रफळ आदी बाबी वगळून उर्वरित क्षेत्रफळाची मोजणी करून कर आकारणी करावी. तसेच इमारतीवरील उभारण्यात आलेल्या पत्रा शेडचा कर रकमेत समावेश करू नये.
घराबाहेरील बंदिस्त नसलेल्या वाहन शेडचा देखील समावेश करू नये आदी मुद्द्यांचा विचार करून कर आकारणी करताना नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी या सर्व बाजूंचा निश्चित विचार केला जाईल व तक्रारदारांचे फेर सर्वेक्षण करू शंकांचे निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले.
.. तोपर्यंत घरपट्टी भरू नका
यासदंर्भात गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी चुकीचे मोजमाप घेतल्याने तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी माजी आ. रमेश कदम, प्रशांत यादव यांनी जोपर्यंत या विषयाचे निराकारण होत नाही तोपर्यंत घरपट्टी भरू नका, असे नागरिकांना आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 20/Dec/2024














