संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. २८) धामणी येथे दोन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडीत तीन कुत्र्यांची लहान पिल्ले जखमी झाली होती. त्या कुत्र्यांवर संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. याबद्दल पशुधन विकास अधिकारी मनोहर ढाकणे यांचे कौतुक केले जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रेल्वे रोडस्टेशनपासून जवळच असलेल्या धामणी येथील मोरया धाब्यासमोर भरधाव वेगात आलेल्या मोटार कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी गाडीला धडक दिली. दोन गाड्यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात सात प्रवाशांना मार लागला होता. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर एका महिलेला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले.
एका चारचाकी गाडीमधून प्रवास करणाऱ्या व गंभीर जखमी झालेल्या एका महिलेबरोबर पपी जातीचे तीन कुत्रे अपघातात जखमी झाले होते. अपघातामुळे ते तिन्ही कुत्रे घाबरून सैरभैर झाले होते. एका कुत्र्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्या कुत्र्यांवर उपचार होणे आवश्यक होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्या पपी कुत्र्याला जवळच असलेल्या संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मनोहर ढाकणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. तातडीने उपचार झाल्यामुळे जखमी कुत्रा बरा झाला आहे.
अपघाताला आळा घालण्याची गरज
महामार्गावर गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी आरटीओ किंवा पोलिसांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. वेगाने वाहने चालवल्यामुळे अपघात होत आहेत. सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने चालवताना कसरत करावी लागते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 31/Dec/2024












