चिपळूण : शहरातील भोगाळे येथील परशुराम प्लाझा इमारतीच्या तिसर्या मजल्यावर राहणार्या एका तरुणाने तिसर्या मजल्यावरून उडी टाकून जीवन संपवले . रोहन दुर्योधन नेताम (वय 19, मूळ रा. जि. गोंदिया) असे या तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताकदिनी रविवारी रात्री ही घटना घडली. रोहन आणि त्याचा मित्र परशुराम प्लाझा येथे राहात होते. तो चिपळूणमध्ये नोकरीला होता. तो आणि मित्र हे रूममध्ये बसलेले असताना आपला मोबाईल कुणी घेतला, असे विचारू लागला. याचवेळी मित्राने तुझा मोबाईल माझ्याकडे आहे, असे सांगून त्याला दाखविला. याचा राग येऊन रोहन याने तो मोबाईल लादीवर जोराने आपटला आणि रागाच्या भरात बाल्कनीमध्ये जाऊन तिसर्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली आणि तो घटनास्थळीच गतप्राण झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले.
तत्काळ चिपळूण पोलिसांना त्याची खबर देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत असल्याचे घोषीत केले. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-01-2025












