रामतीर्थ, विरेश्वर तलाव संवर्धनासाठी आ. शेखर निकम यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट

चिपळूण : शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रामतीर्थ व वीरश्वर तलावाच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, अशी मागणी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात चिपळूण शहराच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतल्याचे पाहावयास मिळाले आहे. यामध्ये शहरात वाशिष्ठी नदीवरील पेठमाप व शंकरवाडीला जोडणारा पूल असो, पवन तलाव व गोवळकोट मैदानाच्या सुशोभीकरणासाठी घेतलेला पुढाकार तसेच नारायण तलाव असो आदी शहरातील कामांसाठी आमदार निकम यांनी नेहमीच पुढाकार घेतला. यामुळे खेळाडू व पर्यटकांना चांगला वाव मिळाला आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत झालेल्या सामूहिक प्रयत्नामुळे शहरातील नारायण तलावाने कात टाकली. या तलावाचे सौंदर्य फुलले असून, येथे नियमित फिरण्यास येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. या तलावामुळे शहरवासीयांना तेथे मोकळ्या वातावरणातील निसर्गाचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. भरचौकात असलेल्या या पुतळा परिसरात शहरवासीयांची नियमित वर्दळ असते. अनेक तरुण- तरुणी, ज्येष्ठ नागरिक पुतळा परिसरात सुशोभीकरणाचा आनंद घेत आहेत. आता रामतीर्थ तलाव आणि विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या कामी निधी मिळाल्यास शहराच्या वैभवात आणखी भर पडण्यास मदत होणार आहे. यासाठी पंकजा मुंडे यांनी सकारात्मकता दर्शवल आहे.

शहराच्या वैभवात भर पडणार
चिपळूण शहराच्या वैभवात आणख भर पडावी यासाठी आमदार निकम यांनी आता पुढाकार घेतला असून, राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वीरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी १ कोटी ५० लाख ६५ हजार ६६४ रुपये व रामतीर्थ तलावाच्या संवर्धनासाठी ३ कोटी ७० लाख ८३ हजार ७९९ रुपयांच्या निधीस मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यत मिळावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 31/Jan/2025