खेड : तालुक्यातील सर्वात वर्दळीचा असला तरी दुर्लक्षित असलेल्या खेड-भोस्ते-रेल्वे स्टेशन मार्गावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी करत शेकडो रिक्षा चालकांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण केले. त्यांना चार दिवसांत खड्डे भरण्यात येतील, असे आश्वासन लोक प्रतिनिधी व संबंधित बांधकाम विभागाने दिले. मात्र या मार्गाची स्थिती जैसे थे असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
खेडमधील सामाजिक कार्यकर्ते तथा रिक्षा व्यवसायिक मंगेश मोरे यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ व दि.२६ जानेवारी २०२५ रोजी खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खेड भोस्ते रेल्वे स्टेशन मार्गावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी करत उपोषण सुरू केले होते. मात्र दोन्ही वेळेस स्थानिक लोक प्रतिनिधी यांना मध्यस्ती करण्यास विनंती करून जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांनी उपोषण करणाऱ्यांची दिशाभूल केली. परिणामी खड्डे भरण्याचे केवळ पोकळ आश्वासन देत प्रत्यक्षात या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
खेड मध्ये ये जा करण्यासाठी भोस्ते मार्ग सोयीचा व जवळचा रस्ता आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसे दोन्ही वाचतात. त्यामुळे या मार्गाचा वापर रिक्षा व्यवसायिक रेल्वे स्टेशन ते खेड बसस्थानक प्रवासी वाहतुकीसाठी करतात. मात्र रस्त्याची चाळण झाल्याने रिक्षा व्यवसायिक, प्रवासी, दुचाकी चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु रस्त्याची अवस्था अतिशय खराब असल्याने तत्काळ डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 04/Feb/2025














