चिपळूण नगर परिषदेच्या वतीने सायकल दिवस

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्याच्या एक तारखेला सायकल दिवस उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील शेकडो नागरिक सायकल घेऊन सहभागी झाले होते. तसेच शहरातील सायकल क्लब अर्थात सायकलप्रेमी संघटनांचा सहभाग होता.

महाराष्ट्र शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘एक दिवस सायकल’ वापरण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये १ जानेवारी रोजी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी रोजी सायकल फेरी काढण्यात आली. अभियानानुसार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वाहन न वापरता सायकलचा वापर करावा अथवा पायी चालावे अशी संकल्पना घेऊन अभियान राबविण्यात येत आहे.

त्याप्रमाणे जानेवारीच्या १ तारेखनंतर फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेला न.प. मार्फत नागरिकांना वाहनाऐवजी सायकलचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्यानुसार चिपळुणातील सायकल क्लबचे सदस्य तसेच शेकडो नागरिक दि. १ रोजी या अभियानात सहभागी झाले होते. न.प. पासून सहभागींनी सायकल फेरी काढली व जनजागृती केली, यावेळी प्रात्तिनिधीक स्वरूपात नागरिकांचा सन्मान करण्यात आला तर नेहमीच सायकलचा वापर करणाऱ्यांचा देखील यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानुसार अजित जोशी, प्रशांत दाभोळकर, प्रभाकर सुर्वे, श्रीकांत जोशी आदींबरोबरच पायी चालणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक राम रेडीज, सुरज भोई, शेखर मोहिते, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, चंद्रशेखर खेडेकर आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सायकल चालविण्याबरोबरच पायी चालण्यासाठी नागरिकांसमवेत न.प.तील मंगेश पेढांबकर, संतोष दंडवते, बापू साडविलकर, वैभव निवाते, श्री. खाड्ये, गणेश कदम, अमोल वीर आदीसह विविध विभागातील विभागप्रमुख कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 04/Feb/2025