राजापूर : आंदोलन छेडण्यापूर्वी जैतापूर शाळेत शिक्षक दाखल

राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ या सेमी इंग्रजी शाळेला पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहायक शिक्षक मिळावा यासाठी पालकांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामस्थ आणि पालकांकडून शिक्षक मागणीसाठी शाळा बंद आंदोलन छेडण्यात येणार होते; मात्र दुपारी शाळेमध्ये एक शिक्षक दाखल झाल्याने ग्रामस्थ आणि पालक यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेमध्ये आज एक शिक्षक हजर झाला असला, तरी कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, ही मागणी कायम आहे. भविष्यात ही मागणी पूर्ण न झाल्यास पाल्यांसह पंचायत समिती कार्यालयावर धडक देण्याचा इशारा जैतापूर येथील ग्रामस्थ आणि पालक यांनी दिला आहे. तालुक्यातील जैतापूर येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे दोन पूर्णवेळ शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी एक कामगिरी शिक्षक दिला होता तसेच सहायक शिक्षक तेही आलटून पालटून कार्यरत होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याने पालकांसह ग्रामस्थांनी सातत्याने पंचायत समिती शिक्षण विभागाशी संपर्क साधून शिक्षक देण्याची मागणी केली होती; मात्र, त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह पालकांनी इंग्रजी शाळेला पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहायक शिक्षक मिळावा या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यानंतर, प्रशासनाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन न करता सहकार्य केले; मात्र प्रशासनाने पुन्हा एक शिक्षक कमी केल्याने पालक आक्रमक होत पुन्हा एकदा जैतापूर शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, आमदार किरण सामंत यांना दिले होते. त्यानंतरही पालकांनी आज शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

दरम्यान, शिक्षक शाळेमध्ये हजर न झाल्याने पालकांनी मुलांना घेऊन शाळा बंद आंदोलन सुरू केले होते; मात्र, त्याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान, सरपंच राजप्रसाद राऊत यांनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, एक शिक्षिका कामगिरीवर पाठवली असल्याची माहिती मिळाली. दुपारी संबंधित शिक्षिका शाळेमध्ये हजर झाल्याने ग्रामस्थांसह पालकांनी तात्पुरते स्वरूपामध्ये आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

पालक आक्रमक
ग्रामस्थांसह पालकांनी इंग्रजी शाळेला पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहायक शिक्षक मिळावा या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर, प्रशासनाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन न करता सहकार्य केले; मात्र प्रशासनाने पुन्हा एक शिक्षक कमी केल्याने पालक आक्रमक बनले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 10/Feb/2025