लांजा : लांजा नगरपंचायतीच्या अखत्यारितील छत्रपती शिवाजी चौक ते राष्ट्रीय महामार्ग ६६ या दरम्यानच्या रस्त्यालगत सुरू असलेले निकृष्ट दर्जाच्या गटाराचे काम लांजा शहर समन्वय समिती आणि जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून बंद पाडले.
लांजा शहर समन्वय समितीचे पदाधिकारी प्रसन्न शेट्ये, विजय कुरूप, शेखर स्वामी, संजय तोडकरी, निरंजन देशमुख यांच्यासह नागरिक भैरूलाल भंडारी, प्रभागाचे नगरसेवक संजय यादव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या गटाराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याने अभियंत्यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांच्या समक्ष या गटार कामाचा दर्जा काय आहे, हे दाखवून दिले. या बांधकामात असलेल्या अनेक त्रुटी मांडण्यात आल्या आणि काम तत्काळ बंद करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या. कामातील त्रुटी दोष दूर करून दर्जात्मक काम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
नगरपंचायतीवर काढणार मोर्चा
शहर परिसरात ज्या ज्या ठिकाणी गटारे, रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची असतील त्या विरोधात लांजा शहर समन्वय समिती नगरपंचायतीवर मोर्चा काढणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्याबरोबरच त्याची बिलेदेखील काढण्यात येणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 10/Feb/2025














