चिपळूण : वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तोडण्यास प्रारंभ

चिपळूण : बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदीवर उभारण्यात आलेला सुमारे शंभर वर्षापूर्वीचा जुना पूल निष्काषित करण्यास सुरुवात झाली असून, महामार्गावर नव्याने दोन पूल उभारणी झाल्यावर ब्रिटिशकालीन पूल म्हणून ओळख असलेला हा जुना पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा बहादरशेखचा जुना पूल आता इतिहासजमा होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग जोडण्यासाठी वाशिष्ठी नदीवर सुमारे शंभर वर्षांपूर्वी अर्थात ब्रिटीश काळात दगडी कामाचा पूल बांधण्यात आला होता. सुमारे शंभर वर्षे या पुलावर वाहतूक सुरू होती. पुलाला पर्यायी पूल उभारावा, अशी मागणीदेखील नागरिकांकडून होत होती.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यावर जुन्या पुलानजिक नव्याने दोन पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वी महामार्ग रुंदीकरणाचा व पूल उभारण्याचे नियोजन प्रस्तावित असताना बहादूरशेख येथील जुन्या पुलाची आयुमर्यादा संपल्याच्या अनेक सूचनावजा पत्र संबंधित ब्रिटीश पूल बांधणाऱ्या कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला व शासनाला देण्यात आली होती.

मात्र, पर्यायी पुलांचे काम सुरू होईपर्यंत या पुलाचा वापर सुरू होता. आता महामार्ग रुंदीकरणात नवे दोन पूल उभारले गेल्याने जुना पूल काढून टाकावा, अशी मागणी संबंधित कंपनीच्या पत्राचा दाखला देत शहरातील नागरिक व चिपळूण बचाव समितीकडून सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षात मागणीनंतर पूल तोडण्यास सुमारे दोन वर्षांचा कालावधी गेला.

सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर दोन वर्षांनी बहादूरशेख येथील हा जुना पूल आमदार शेखर निकम व चिपळूण बचाव समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सा. बां. खात्याकडून तोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा जुना पूल आता इतिहासजमा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 15/Feb/2025