नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे टीका करत पवार यांच्यावर आगपाखड केली होती. तसंच पक्षाच्या इतर नेत्यांनीही पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये रंगलेल्या या नाराजीनाट्यानंतर आज दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि संजय राऊत हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहे.

पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसदभवन ते सेंट्रल विस्टा’ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तसंच संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि संजय राऊत नेमकी कशी फटकेबाजी करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पवारांवर टीका करताना काय म्हणाले होते संजय राऊत?

शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान करण्यात आल्याने संतापलेल्या संजय राऊत यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. “ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे, ही आमची भावना आहे. कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेलं नाही. पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित केलं, यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. पवारसाहेब, तुमचं दिल्लीतील राजकारण जे काही आहे ते आम्हाला माहिती नाही, आम्हालाही राजकारण कळतं. पण आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राला या गोष्टीमुळे नक्कीच वेदना झालेल्या आहेत,” अशी भूमिका राऊत यांनी मांडली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 20-02-2025