खेड : तालुक्यातील भोस्ते जगबुडी नदीकिनारी रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सतत वाहनांसह पादचाऱ्यांच्या रेलचेलीने गजबजलेल्या रस्त्यालगत कचरा फेकला जात असल्यामुळे आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत कचरा टाकल्यास १ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय भोस्ते ग्रामपंचायतीने घेतला आहे.
तसा फतवाही काढला असून त्या ठिकाणी फलकही लावला आहे. शहरातील भोस्ते पूल ते रेल्वेस्थानक परिसर मार्गावर पादचाऱ्यांसह वाहनचालकांची सतत रहदारी सुरू असते. शहरात ये-जा करण्यासाठी ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात. पंचक्रोशीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीही याच मार्गाने येत असतात.
भोस्ते जगबुडी नदीकिनारी सर्रासपणे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. याचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. काहीजण नजर चुकवून या ठिकाणी कचरा फेकत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. भोस्ते जगबुडी नदीकिनारी रस्त्यालगत कचरा फेकल्यास ग्रामपंचायतीने मज्जाव केला आहे. या ठिकाणी कोणीही कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईची तंबीही देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 04/Mar/2025














