चिपळूण : शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोण उभारी देणार, हा खऱ्या अर्धाने प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदासाठी माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष पवार, भैय्या कदम, माजी नगरसेवक संजय रेडीज यांची नावे पदासाठी चर्चेत आहेत.
चिपळुणात गेल्या काही वर्षांपासून शिवसेना भक्कम होती. शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी शहरात चांगली संघटना बांधणी केली होती. शिवसेना पक्षफुटीनंतर सकपाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले. शहर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली. अशावेळी उबाठा शिवसेनेने माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यावर शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली, परंतु काही वर्षांतच त्यांनीही उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील ठाकरे शिवसेना पोरकी झाली आहे. सध्या उबाठा शिवसेनेतील माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष पवार भैय्या कदम, माजी नगरसेवक संजय रेडीज यांची नावे शहरप्रमुख प्रदासाठी चर्चेत आहेत. यातील कुणावर जबाबदारी दिली जाते आणि कोण उबाठा शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देते, हे येणारा यामुळेच ठरवेल. शहरात ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. कार्यकर्त्यांचे संघटनदेखील मजबूत होते; मात्र पक्षाअंतर्गत झालेल्या बंडामुळे अनेक पदाधिकारी शिवसेनेत स्थिरावत चालले आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पदाचा राजीनामा दिला होता; मात्र अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पक्षासाठी ताकदीने लढणारे पदाधिकारी बाहेर पडत असल्याने ठाकरे गटास पुन्हा उभारी घेण्यासाठी झगडावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 10/Mar/2025














