दापोली : दापोलीमध्ये दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची दहशत वाढतच आहे. वारंवार नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक एकटे बाहेर पडायला घाबरतात. यावर ठोस उपाययोजना नगरपंचायतीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.
दापोलीतील आतील रस्त्यांवर बहुसंख्येने कुत्री असतात. दुचाकीस्वारांचा पाठलाग करतात. शहरात २०२१ मध्ये ४९५, २०२२ मध्ये ५७०, २०२३ मध्ये ६६१, २०२४ मध्ये ७१२ असे गेल्या चार वर्षांत एकूण २४३८ जणांवर कुत्र्याने हल्ले केले आहेत. २०२२-२३ मध्ये नगरपंचायतीकडून २५० कुत्र्ऱ्यांचे दोन टप्प्यात निर्बीजीकरण केले होते. त्यावेळी साधारण ५ लाख रुपये खर्च आला होता. त्याप्रमाणे याहीवर्षी पुन्हा कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु निविदा कोणत्याही एजन्सीने भरली नाही. त्याला प्रतिसादच मिळाला नाही तसेच पशुवैद्यकीय अधिकारी दापोली यांनाही एक पत्र दिले होते; परंतु त्यांच्याकडूनही काहीच प्रतिसाद आला नाही. सध्या तरी संपूर्ण शहरात सुमारे १००० ते १२०० कुत्री आहेत.
गेल्यावर्षी सुमारे ३ हजार जणांना श्वानदंश
गेल्यावर्षी सुमारे ३ हजार १५० जणांना श्वानदंश झाला आहे. यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही; मात्र यावर प्रभावी ठरणाऱ्या श्वानदंशाच्या रेबीज लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता. हापकीन संस्थेकडून हजार रेबीज लसींची मागणी करण्यात आली आहे; परंतु आता पुरेशी लस असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.
कुत्र्यांच्या त्रासाबाबत इथे करू शकता तक्रार
संबंधित पाळीव कुत्रे अपरात्री भुंकल्याने जर झोपमोड होत असेल आणि कुत्र्याच्या मालकाला सांगूनदेखील तो ऐकत नसेल तर आपण महानगरपालिकेच्या पशुकल्याण विभागाशी किंवा पालिकेकडे तक्रारकक्षाशी संपर्क साधून तक्रार देता येते. तेच आपल्या समस्येचे निराकरण करू शकतात तसेच अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ महाराष्ट्रकडे तक्रार दाखल करा, जे प्राणीकल्याण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
सध्या पेट फोर्स पुणे या संस्थेला सर्व नर आणि मादी मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पाचारण करणार आहोत; परंतु त्यासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे – स्वप्नील महाकाळ, आरोग्य विभागप्रमुख
कुत्रे चावण्याच्या घटनेमध्ये मादी कुत्रीचे प्रमाण जास्त आहे. कारण, पिले घातल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कुत्री चावत आहे, असे दिसून येते. भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी एकच मार्ग म्हणजे नर आणि मादीचे निर्बीजीकरण करणे. यासाठी प्रत्येक नगरपालिकेला वार्षिक ५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डीपीडीसीमधून निधी मिळाला पाहिजे किंवा सीएसआर फंड देण्यास कुठल्याही कंपनीने सहकार्य करावे महादेव रोडगे, प्रभारी मुख्याधिकारी, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 17/Mar/2025














