ग्रंथालये आधुनिक करणार : मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : जुनी पुराणी ग्रंथसंपदा, साहित्य यानाचे जतन झाले पाहिजे. त्यासाठी आगामी वर्षभरात ग्रंथालयांची परिस्थिती बदलून ती आधुनिक करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा साहित्य संमेलनाचे उदघाटन आज सावंतवाडी येथील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहीत्य नगरीमध्ये नितेश राणे यांच्या हस्ते झाले, त्यांनतर ते बोलत होते.

कोकणात कधीही न येणाऱ्यांपर्यंत कोकण पोहोचवण्याचे काम अशा साहित्य संमेलनातून होत असते, त्यासाठी हे संमेलन महत्वाचे असल्याचे राणे यांनी सांगितले. मालवणी बोली भाषा भवन उभारण्यासाठी एकत्र या, त्यासाठी शासन म्हणून पाठीशी राहू अशी ग्वाही देखील राणे यांनी यावेळी दिली.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज श्री. राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत असून आमदार दीपक केसरकर या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. आज सकाळी ग्रंथ दिंडीने या साहित्य संमेलनाला सुरवात झाली. संमेलन स्थानी ज्येष्ठ कवी वसंत सावंत ग्रंथदालन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झाले. नवोदित लेखक, कवींचे दहाहून अधिक संग्रह प्रकाशित करण्यात आले.

यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश खेबुडकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, सावंतवाडी कोमसापचे अध्यक्ष संतोष सावंत, विठ्ठल कदम, राजू तावडे, अभिमन्यू लोंढें, नकुल पार्सेकर, दिपक पटेकर, रुपेश पाटील, पत्रकार शेखर सामंत, डॉ. मिलींद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिपक नेवगी यांच्या नावाने भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले तर मिलींद भोसले यांच्या नावाने गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांना गौरविण्यात आले.

यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले, या संमेलनाला मी येणार की नाही याबाबत चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील संमेलन असल्यामुळे मी काही काळ का होईना त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, असा आयोजकांना शब्द दिला होता. त्यानुसार मी या ठिकाणी आलो आहे. राणे हे नुसते बोलणारे नाहीत तर करुन दाखविणारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर नुसती भाषणबाजी न करता साहित्यांची चळवळ जीवंत रहावी यासाठी शासनाचा मंत्री म्हणून काही तरी करावे या शुध्द हेतूने मी या ठिकाणी उपस्थिती दर्शविली आहे. दुसरीकडे कणकवली येथील वाचनालयाचा मी अध्यक्ष असून त्या ठिकाणी काम करीत असताना अनेक अडचणी येतात. हे मला माहित आहे. त्यामुळे या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहे.

ते पुढे म्हणाले, माझे शिक्षण लंडन मध्ये झाले. शिक्षणासाठी असताना आणि आता विदेशात गेल्यानंतर त्या ठिकाणच्या वाचनालयाला मी भेटी देतो. त्या ठिकाणची परिस्थिती ही अत्यंत चांगली असते. परंतू आपल्याकडील वाचनालयाची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ती परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रत्येक वाचनालय सुधारावे आणि त्याचा फायदा नव्या साहित्यिकांना आणि पुढील पिढीला व्हावा या उद्देशाने या वाचनालयाचे आधुनिकीकरण आणि ई-लायब्ररी सारखे उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. त्याच बरोबर सिंधुदुर्ग पत्रकार संघाने जशा प्रकारे चांगला उपक्रम राबविला त्याच प्रमाणे आता साहित्यिकांनी पुढाकार घेवून कोकणात मालवणी भवन उभे राहण्यासाठी प्रयत्न करुयात. विशेष म्हणजे येथील साहित्यीकांनी केवळ माझ्यावर जबाबदारी न टाकता आपल्याला हवे तसे बदल किंवा सुचना कराव्यात जेणे करुन त्या ठिकाणी चांगले रिझल्ट भविष्यात दिसतील.

कणकवलीत नाट्यगृह नसल्यामुळे प्रशांत दामले मला बडबडले. अजून ही माझ्या कानातील रक्त सुकले नाही. त्यामुळे पालकमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर पहिले कणकवलीत नाट्यगृह बांधण्यासाठी बांधकामची बैठक घेवून कामाला लागलो. सावंतवाडी, वेंगुर्लेत नाट्यगृहे आहेत. ही कौतूकाची बाब आहे, असे मत राज्याचे नितेश राणे यांनी आज व्यक्त केले.

आमदार, मंत्री असलो तरी पहिला मी हिंदू आहे. त्यामुळे कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी माझी हिंदुत्वाची भूमिका उघडपणे मांडणार. कितीही अंगावर आले तरी आपल्याला फरक पडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर कार्यक्रमात मांडली. आपण या ठिकाणी बोलणार नव्हतो. गेले दोन आठवडे राज्यात आपल्याच नावाने कार्यक्रम सुरू आहे. परंतू मी राणे आहे. त्यामुळे कोणी कितीही टिका करण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:53 22-03-2025