संगमेश्वर : आरवलीतील सेवा रस्त्याच्या नाले बांधकामाला सुरुवात

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील चौपदरीकरण रस्त्याच्या पश्चिमेकडील सेवारस्त्याच्या नाले बांधकामास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या बाजूस अंदाजे दोन हजार फूट लांब व चार फूट रूंद आकाराचा नाला बांधण्यात येणार आहे. हा नाला स्टेट बँकेच्या शाखेपासून ते गरम पाण्याच्या कुंडापर्यंत बांधण्याचे नियोजन आहे. नाला बांधकाम पूर्ण झाले की, पश्चिमेकडील सेवारस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल. ही कामे पूर्ण झाल्यास येथील सेवा रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबेल. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

महामार्गाच्या रत्नागिरी-चिपळूण पाश्चिमेकडील सेवारस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण व्हावे तसेच नाल्याची कामे व्हावीत, अशी मागणी करण्यात येत होती. महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचांबे परिसरासाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूस कुचांबे, मुरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीला जाण्यासाठी, तर पश्चिमेला कोंडीवरे, माखजन, बुरबांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी सेवारस्ता तयार करण्यात आला आहे. उड्डाणपूल व सेवारस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने सेवारस्त्याचा बोजवारा उडाला होता.

रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नव्हते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत होती. रस्त्याला नाले काढलेले नव्हते. सेवारस्त्याची दुरुस्ती होत असल्याने प्रवासी व वाहनचालकांची समस्या मिटणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 29/Apr/2025