रत्नागिरी : नजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर महिलांच्या देहविक्रीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, त्याचा तपास सुरू आहे. तरुणी पुरविणारा आणखी एक संशयित फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. तो या मुलींना वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महिलांची तस्करी
(ह्युमन ट्रैफिकिंग) सुरू आहे का, याचा तपासही सुरू केला आहे.
या प्रकरणाच्या अगदी खोलात जाऊन तपास केला जाईल, अशी माहिती श्री धनंजय कुलकर्णी यांनी दिली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार चालू असल्याची गोपनीय पोलिसांना माहिती होती. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पथक तयार केले.
एक बनावट गि-हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्रासमोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकला. यावेळी देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ महिला आणि संशयित अरमान करीम खान (रा. कोकणनगर) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित आरोपी अरमान खान याला अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्यांतर्गत अटक केली. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सलमान खान नामक आणखी एक मुख्य संशयित यामध्ये आहे. तो वेगवेगळ्या मुलींना पुरविण्याचे काम करतो. तसेच या मुलींना वेगवेगळ्या शहरातही नेल्याची माहिती पुढे येत आहे. यावरून पोलिसांनी सलमान खानचा शोध सुरू केला आहे.
रत्नागिरीत देहविक्रीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. तपासात काही माहिती निष्पन्न झाली आहे. त्यानुसार अन्य कोणी निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्या चारही महिलांना महिला सुधारगृहात पाठविले आहेत. यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असल्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. परजिल्ह्यातही हा तपास सुरू आहे. तपासातील माहितीवरून जे निष्पन्न होतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – श्री. धनंजय कुलकर्णी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 17/May/2025














