संगमेश्वर : यावर्षीच्या गणेशोत्सवातील गौरी पूर्वा नक्षत्रात ( Purva nakshatra ) येणार असल्याने नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना ओवसा (ओवासणे) हा पारंपरिक विधी साजरा करता येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सुपांच्या खरेदी-विक्रीला तालुक्यात जोर चढला असून, एक ओवसा (छोट्या-मोठ्या सुपाचा संच) १८०० ते २००० रुपयांना विकला जात आहे.
ओवसा या परंपरागत प्रथेसाठी बांबूच्या विळशांपासून वळलेली ५ सुपे आवश्यक असतात. यातील ३ सुपं मोठी, तर २ छोटी असतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनीने लग्नानंतर पहिल्या पूर्वा नक्षत्रात ओवसा साजरा करायचा असतो. यासाठी ५ सुपांमध्ये विविध प्रकारांची फळे, सौभाग्याच लेणं, तांदूळ, ओटी आदी विविध प्रकारांचे पूजासाहित्य मांडून ही सुपं गौरीसमोर ठेवून त्याचे मनोभावे पूजन करायचे आणि गौरीला नैवेद्य दाखवायचा याचे पूजन झाल्यावर सर्वांनी या सुपांचे दर्शन घ्यायचे, असा प्रघात आहे.
लग्नानंतर पहिल्याच वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्यास हा सण साजरा होतो, नंतर याचे स्वरूप घरगुती केले जाते. ओवसा या प्रकारासाठी लागणारी बांबूची सुपं वळप करून घट्ट विणीने तयार करणारे कारागीर फारच कमी झाले आहेत. नव्या पिढीमध्ये याबाबत फारशी आवड नसल्याने आजही वयोवृद्ध मंडळीच हे काम करताना दिसतात.
याबाबत गणेशोत्सवातील गौरीही पूर्वा नक्षत्रालाचा येत असल्याने यावर्षीच लग्न झालेल्या सुवासिनींचा ओवसा साजरा होणार आहे. यासाठी आतापासूनच संगमेश्वर आणि देवरूख बाजारपेठेत ओवशाच्या सुपांची जोरात विक्री सुरू आहे.
कारागिरांना रोजगार
ओवसा सण वळप कारागिरांसाठी हक्काचा रोजगार आहे. संगमेश्वर तालुक्यातील शिवने, तेरये, बुरंबी या गावांमध्ये बांबूचे वळप काम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणावर आहेत. हे काम खूप कठीण आणि वेळ काढू असते. ज्यावर्षी गौरीचे आगमन पूर्वा नक्षत्राला होते, त्याच वर्षी या सुपांची मागणी वाढते आणि यातून या कारागिरांना चांगला व्यवसाय मिळतो.
गणेशोत्सवात ओवसा साजरा होणार असेल, तर सुपांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. सध्या बाजारपेठेत फायबरची सुपं मिळत असल्यामुळे दैनंदिन वापरासाठी फार कमी लोक बांबूची सुपं वापरतात. त्यामुळे सुपांची मागणी खूपच कमी आहे, तसेच वीणकाम करणाऱ्या कारागिरांची संख्याही कमी झाली असल्याने वळप व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यावर्षी गणेशोत्सवात ओवसा साजरा होणार असल्यामुळे सध्या वळप कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे. – रमेश जाधव वळप, कारागीर, शिवने संगमेश्वर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 PM 28/Aug/2025












