लांजा : लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला वाहतुकीवर गस्त घालण्यासाठी उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या गाडीला एका भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. लांजा शहरात बस स्थानकात जाणाऱ्या एसटी बसच्या मागे असलेली एक दुचाकी भरधावपणे बाजू काढून जाताना हा अपघात घडला. यामध्ये वाहतुकीवर गस्त घालत असलेले वाहतूक पोलीस व एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले. लांजा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर घडलेल्या या अपघातामुळे चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणत वाहनांची रहदारी आहे. शहरात वाहतूककोंडी समस्या निर्माण होऊ नये यासाठी दोन दिवस आधीपासूनच लांजा पोलिस वाहतुकीवर नियंत्रण आणत आहेत. गणेशोत्सामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ३.३० वा. च्या दरम्यान लांजा बसस्थानकासमोर वाहतूक गस्त घालण्यासाठी लांजा पोलिसांची एक गाडी उभी होती. गाडीत एक पोलीस अधिकारी बसलेले होते, तर गाडीबाहेर वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांशी बोलत होते. भरधाव दुचाकी ओव्हरटेक करत असताना उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीवर जाऊन धडकली. ही अॅक्टिव्हा एक चाकरमानी युवक चालवत होता. मात्र, दुचाकीच्या धडकेत पोलिसांच्या गाडीला पकडून उभे असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी व एक पोलीस अधिकारी सुदैवाने बचावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 28-Aug-25














