चिपळुणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, ड्रोन, लेझर लाईटवर बंदी

चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी गणेशोत्सव मंडळ, डीजे, ड्रोन, साऊंड सिस्टीम मालकांची शनिवारी पोलीस स्थानकात बैठक घेतली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गणेशोत्सवही शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवून साजरा करण्याचे आवाहन करतानाच शासकीय नियमानुसार, उत्सव काळात रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत साऊंड सिस्टीम लावण्यावर बंदी असल्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली.

चिपळूण पोलीस स्थानकात शनिवारी पार पडलेल्या या बैठकीत पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी शासनाच्या सूचना, नियमावलींचे वाचन केले. या गणेशोत्सव काळात डीजे वाजविण्यावर बंदी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांना आयडी कार्ड अनिवार्य आहे. कार्यकर्त्यांनी विशिष्ट ड्रेस कोड वापरावा. रस्त्यावरील स्वागत कमान उंच कराव्यात. रात्री १० नंतर साऊंड सिस्टिमला बंदी घालण्यात आल्याने त्याचे काटेकोरपणे पालन करावे.

अन्य समाजाबद्दल द्वेष, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन सामाजिक सलोखा राखावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रीतसर परवानगी घ्यावी. कोणीही लेझर लाईटचा वापर करू नये. गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीचे नेटके व्यवस्थापन करावे. महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत आटपेल याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची अथवा स्वयंसेवकांची एक यादी पोलीस स्थानकाला द्यावी. महावितरणने गणेशोत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना बैठकीत श्री. मेंगडे व डीवायएसपी बेले यांनी केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरची अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र अनेक वाहने शहरालगत महामार्गावर उभी करतात. यावर उपाययोजना करावी, अशी सूचना कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली. यावर श्री. मेंगडे यांनी सांगितले की, हा प्रकार यावर्षी होणार नाही. आम्ही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वालोपे येथे तर दुसरी कामथे परिसरात थांबवून ठेवणार आहोत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहिली.या बैठकीला राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी, डीजे, साऊंड सिस्टीम, ड्रोन मालक, शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Shanti real estate 1

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 28-Aug-25