Ganesh Murti : खेडमध्ये २१ सार्वजनिक, १३,७३६ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

खेड : ढोल-ताशांच्या गजरात खेड तालुक्यात बुधवारी गणरायाचे आगमन जल्लोषात झाले. शहरासह ग्रामीण भागातील २१ ठिकाणी सार्वजनिक व १३,७३६ घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पोलिस व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार गणरायाच्या स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या.

शहरात मुरली मनोहर उत्सव गुजरआळी, उद्धव ठाकरे शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तीनबत्तीनाका, शिंदेंच्या शिवसेना आयोजित खांबतळे समोरील खेडचा महाराज सार्वजनिक गणपती, एसटी स्टॅण्ड आगार मंडळ, वडार समाज मंडळ, महात्मा फुले नगर, राजवैभव प्रतिष्ठानचा गणपती छत्रपती शिवाजी महाराज चौक, टायटनचा राजा गणेशोत्सव मंडळ शिवतररोड, नातूवाडी प्रकल्प मंडळ भरणे, महाराष्ट्र बेलदार संघटना मंडळ, भरणे वडार समाज युवक मंडळ भरणे, पुरस्कृत जयगणेश मित्र मंडळ, भरणे, संघर्ष मित्र मंडळ, भरणे, गणेशोत्सव मंडळ दस्तुरी इत्यादी ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणेशमूर्तीच्या लहान-मोठ्या मिरवणुका गणेशचित्र शाळांतून बुधवारी घरोघरी गेल्या. अनेकांनी हातगाडी, रिक्षा, मोटारी, तर काहींनी दुचाकी व डोक्यावरून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेले. १३ हजार ७३६ घरांमध्ये गणेशमूर्तीचीही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शहरात व ग्रामीण भागात सार्वजनिक उत्सव ठिकाणी राखीव पोलिस दल, स्थानिक पोलिस व गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी शिवसेनेतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आगमन मिरवणूक काढण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:31 PM 28-Aug-2025