Ratnagiri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२४-२५ करिता इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 30 सप्टेंबर पर्यंत 3 प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ”, “ब”, “क”,”ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु.1 लाख, रु.75 हजार, रु.50 हजार, रु. 25 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु.50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. 25 हजार रुपये इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:01 PM 28-Aug-2025

Mobile hub