Lanja : माचाळमध्ये १०० फूट खोल दरीत कोसळली मोटार

लांजा : तालुक्यातील माचाळ येथील प्रसिद्ध रिव्हर्स फॉल परिसरात २६ ऑगस्टला धुक्याचा अंदाज न आल्याने मोटार १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातग्रस्त मोटारीत तीन महिला आणि एक पुरुष असे चौघे जण होते. मोटार कोसळल्यानंतर त्यांनी तत्काळ माचाळ ग्रामस्थांना माहिती दिली; मात्र अंधार पडल्याने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढणे रात्री शक्य झाले नाही. त्यामुळे २७ ऑगस्टला अपघातग्रस्त मोटार बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली; परंतु, क्रेनने गाडी बाहेर काढताना ती चिखलात फसल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली होती, नंतर जेसीबीने गाडी काढण्यात आली. गुरुवारी (ता. २८) उशिरा संध्याकाळपर्यंत क्रेन मशीन हलविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मोटार देवरूख येथील असल्याची चर्चा आहे. माचाळ येथे वाहने पार्किंगसाठी स्पष्ट सूचनाफलक असूनही संबंधित व्यक्तींनी मोटार रिव्हर्स फॉलच्या परिसरात का नेली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 29-Aug-2025