तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र देवाळे यांची निवड

चिपळूण : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी येथे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी रवींद्र देवाळे यांची निवड करण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी सोमवार दि.२५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत अध्यक्ष पदाच्या नावावर एक मत झाले. या ग्रामसभेत रवींद्र देवाळे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड होताच उपस्थित ग्रामस्थांनी नूतन अध्यक्ष रवींद्र देवाळे यांचे अभिनंदन केले. तसेच ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी गावाला हा बहुमान प्रथमच प्राप्त झाल्याने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक करण्यात आले. या निवडीबद्दल बोलताना देवाळे म्हणाले की, गावातील वादविवाद, तंटे गावातच मिटवण्यात येतील. गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करू. गावाने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा विश्वास सार्थक करेन असे रवींद्र देवाळे यांनी सांगितले. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय उर्फ पंढरी कदम, सरपंच दिक्षा कांबळी, उपसरपंच संजना कदम, ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) वैजयंती राऊत, पोलीस पाटील सुभाष कदम, मावळते तंटामुक्त अध्यक्ष विजय कदम, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 29-08-2025