दापोली : दापोली शहरात भरदिवसा दुचाकी चोरीची धक्कादायक घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कामगार गल्ली परिसरात असलेल्या खुशी फॅशन हाऊस समोर आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्पेंडर कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
ही दुचाकी खुशी फॅशन हाऊस येथे काम करणारे सचिन कांगणे यांची असून, त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानासमोर आपली मोटारसायकल उभी करून कामावर प्रवेश केला होता. मात्र काही वेळातच संधी साधत चोरट्याने ही दुचाकी पळवून नेली. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये चोरट्याची हालचाल आणि चोरीची पद्धत दिसून येत असल्याने पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा धागा मिळण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच दुचाकी मालकाने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. चोरीस गेलेली दुचाकी स्पेंडर कंपनीची असून तिचा वाहन क्रमांक MH 08 U 0574 असा आहे.
भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, सदर दुचाकी किंवा संशयित व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास 74472 11622 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 30/Dec/2025














