खेड : बहिरवली नांदगाव रस्ता धोकादायक; वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

Jun 22, 2024 - 10:21
Jun 22, 2024 - 10:23
 0
खेड : बहिरवली नांदगाव रस्ता धोकादायक; वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

खेड : तालुक्यातील बहिरवली खाडीपट्टा मार्गावर नांदगाव गावच्या बस थांब्याजवळ डोंगरात करण्यात आलेल्या खोदाईमधून पावसाच्या पाण्यासोबत चिखल रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुचाकी व लहान चारचाकी वाहने घसरत असल्याने बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील बहिरवली मार्गावरील नांदगावच्या एसटी बस थांच्या जवळच्या डोंगरात गेल्या मे महिन्यामध्ये खोदकाम सुरू होते. मात्र रस्त्यालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार खोदण्यात न आल्याने आता पावसाळ्यामध्ये डोंगराची सर्व माती धुपून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी घसरत असून अपघात झाले आहेत. डांबरी रस्त्यावर चिखल पसरल्याने दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहन चालक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गंभीर समस्येबाबत प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने खाडीपट्ट‌यातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे या समस्येकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालक तसेच स्थानिकांमधून होत आहे.

बांधकाम विभागाला सूचना करणार तहसीलदार
खेड बहिरवली मागावर नांदगाव येथे चिखलमय झालेल्या रस्त्याबाबत काही ग्रामस्थांनी खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्याकडे संपर्क साधून कैफियत मांडली. यावर त्यांनी आपण बांधकाम खात्याला याबाबत कळवू असे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 22/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow