रत्नागिरी : कळझोंडी मार्गावरील झाड श्रमदानातून तोडले; १२तासानंतर वाहतूक सुरळीत

Jun 26, 2024 - 14:29
 0
रत्नागिरी : कळझोंडी मार्गावरील झाड श्रमदानातून तोडले; १२तासानंतर वाहतूक सुरळीत

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी येथील स्मशानभूमीतील भलेमोठे मोहटीचे झाड सोमवारी (ता. २४) रात्री उन्मळून पडले. त्यामुळे येथील वाहतूक बारा तास बंद होती. झाड काढण्यासाठी प्रशासन हालचाल करेल, अशी अपेक्षा न बाळगता कळझोंडी गावचे उपक्रमशील उपसरपंच व उद्योजक प्रकाश रामचंद्र पवार यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतः झाड कटरने कापून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. त्यामुळे कळझोंडी येथील हा रस्ता वाहतुकीस सुरळीत सुरू झाला. 

कळझोंडी बौद्धवाडीची स्मशानभूमी ही वरवडेवरचे ते कळझोंडी सीमेच्या मध्यभागी आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने हजेरी लावली होती. वेगवान वाऱ्यामुळे कळझोंडी बौद्धवाडी स्मशानभूमी येथील दरेवर असलेले मोहटीचे भलेमोठे झाड रहदारीच्या रस्त्यावरच कोसळले, रस्त्यात झाड आडवे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

सुमारे बारा तास होऊन गेले तरीही झाड काढण्यासाठी कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे वरवडे-कळझोंडी धरणमार्गाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. याबाबत वरवडे येथील ग्रामस्थ चंद्रकांत विचारे यांनी कळझोंडी बौद्धवाडी येथील किशोर पवार यांना झाड पडले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी हा प्रकार उपसरपंच प्रकाश पवार यांना सांगितला.

प्रकाश पवार यांनी तातडीने त्यांचे सहकारी ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष पवार, भीमराज पवार, ग्रामस्थ महादेव आग्रे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सदस्य किशोर पवार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. तेथील पाहणी केल्यानंतर कटरच्या साह्याने झाड तोडण्यास सुरवात केली. काही कालावधीतच रस्त्यावरील वाहतूक मोकळी झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow