चिपळूण : नदीकिनाऱ्यालगतची भातशेती पाण्याखालीच, भात रोपे कुजण्याचा धोका

Jul 10, 2024 - 10:36
Jul 10, 2024 - 10:38
 0
चिपळूण : नदीकिनाऱ्यालगतची भातशेती पाण्याखालीच, भात रोपे कुजण्याचा धोका

चिपळूण : गेले चार-पाच दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या शिवाय भातशेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने किनाऱ्यालगतची भातशेती पाण्याखाली गेली आहे.

यामुळे भातपिकाचे नुकसान होण्याचा धोका संभवत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात झाला असून आतापर्यंत १ हजार ४०५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आहे. 

यावर्षी पाऊस सुरू झाल्यानंतर सलगपणाने पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेतीच्या मशागतीनंतर शेतकरी लावणीच्या कामात गुंतला आहे. जुलै महिना सुरू झाल्यानंतर ५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी होता. मात्र, त्यानंतर अचानक पावसाचा जोर वाढला आणि कोकणपट्टीत जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यासह ग्रामीण भागातील नदी, नाल्यांच्या किनाऱ्यालगत असणारी भातशेती, तसेच डोंगर उतारावरील भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे पाणी डोंगर उतारावरून भातशेताच्या खाजणात आल्याने नुकतीच लावण्यात आलेली भातरोपे पाण्याखाली गेल्याने ती कुजण्याचा धोका संभवत आहे. विशेषकरून किनाऱ्यालगतच्या भातशेतीला याचा मोठा फटका बसला आहे. नदीचे पाणी उलटून किनाऱ्यालगत दुतर्फा असणारी शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे कोवळी भातरोपे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाभरात जोरदार पाऊस होत असून सोमवारी (दि. ८) गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे गुहागर तालुक्यातील अंजनवेलकडे जाणारा आरे येथील रस्ता बंद झाला होता. आरे पुलावरून पाणी जावू लागल्याने हा मार्ग काही काळ ठप्प होता. दापोलीमध्ये देखील ११८ मि. मी. पावसाची नोंद सोमवारी झाली आहे. खेड ८१, मंडणगड ६८. चिपळूण ३८, संगमेश्वर २१, रत्नागिरी ८३, राजापूर ३५, लांजा परिसरात ५५ मि.मी. पाऊस झाला आहे. दापोलीत झालेल्या पावसामुळे दहागाव येथील रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भातशेती लावणीत गुंतला असून आता शेतकऱ्यांनी डोंगर उतारावरील आणि ज्या भागात पाण्याची समस्या निर्माण होते अशा ठिकाणी लावणीची कामे सुरू केली आहेत तर सखल भागातील भात खाजणामध्ये पाणी भरल्याने पा भागात लावणी करणे अडचणीचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नदी-नाल्यांच्या किनाऱ्यालगत भातशेतीत शिरलेल्या पाण्याची माहिती घेऊन भातशेतीच्या नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना आवाहन गेले चार-पाच दिवस
होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भात उत्पादक शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी या बाबत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना सूचीत केले आहे. भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी पुनर्लागवड केलेले भात आणि नाचणी खाचरातून पाण्याचा निचरा कसा होईल याची व्यवस्था करावी. सखल भागात पावसाचा अंदाज घेऊन भात व नाचणीची पुनर्लागवडीची कामे पुढे ढकलावीत. वरकस भागामध्ये भात आणि नाचणी पिकाची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना करावी. तसेच भाजीपाला आणि नवीन लागवड केलेल्या फळझाडांमध्ये पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी. शेकऱ्यांनी पशुधन सुरक्षित ठिकाणी तसेच त्याला हिरवा पाला देण्याची तरतूद करावी. कुक्कुटपालनाच्या ठिकाणी विजेचा बल्ब लावावा, असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow