चिपळूण : पिंपळीखुर्द येथील भंगाराच्या गोदामामुळे पावसाचे पाणी राहते अडून; रहिवाशांना नाहक त्रास

Jul 10, 2024 - 11:03
Jul 10, 2024 - 11:55
 0
चिपळूण : पिंपळीखुर्द येथील भंगाराच्या गोदामामुळे पावसाचे पाणी राहते अडून; रहिवाशांना नाहक त्रास

चिपळूण : तालुक्यातील पिंपळीखुर्द येथील समर्थ नगरमध्ये महामार्गालगत उभारलेल्या भंगाराच्या गोदामामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. याबाबत येथील रहिवाशांनी सातत्याने चार वर्षारासून प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला, त्यानुसार प्रशासनाने सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेशही दिले, त्यानंतरही गोदाम जैसे थे आहे. परिणामी, यावर्षादेखील येथील रहिवाशांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चिपळूण-कराड मार्गावर पिपळीखुर्द समर्थनगरमधील जगदीश इंदुलकर यांनी या भंगार गोदामाची तक्रार केली होती, त्यांनी पिंपळीखुर्द ग्रामपंचायत, चिपळूण पंचायत समिती, तहसीलदार यांच्याकडून लेखी निवेदन देत समस्या मांडली या गोदामास ग्रामपंचायतीने बांधकामाला परवानगी दिलेली नाही. पावसाळ्यात येथील घरांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, येथील वयोवृद्धांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात येथील पाण्याचा निचरा होत नसल्याने इंदुलकर यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली. त्यानुसार भंगार गोदामाची सविस्तर चौकशी झाली. कारवाई होत नसल्याने इंदुलकर यांनी महाराष्ट्र राज्य मानव एकाधिकार समितीकडे धाव घेतली. त्यानुसार या समितीने प्रशासकीय यंत्रणेला त्वरित कारवाईच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे तहसीलदारांनी गोदाम मालकास स्वखर्चाने बांधकाम पाडण्याचा सूचना तीन महिन्यापूर्वीच दिल्या होत्या; मात्र अद्याप बांधकाम हटविण्यात आलेले नाही. परिणामी, समर्थ नगरमधील जगदीश इंदुलकर यांच्यासह शिंदे, मोरे, जाधव, देसाई कुटुंबीयांना पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसात येथील घरांकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचत असल्याने वयोवृद्धांना घरातच अडकून पडावे लागते. तहसीलदारांनी बांधकाम पाडण्याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात भंगार व्यावसायिकाने खेड सिव्हिल कोर्टात स्थगितीसाठी याचिका दाखल केली आहे. सद्यःस्थितीला गोदामालगतच्या भागातील पाण्याचा निचरा होत नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात येथील कुटुंबीय हैराण झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow