राजापूरातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली.. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामस्थ त्रस्त

Jul 10, 2024 - 11:01
Jul 10, 2024 - 15:12
 0
राजापूरातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली.. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामस्थ त्रस्त

नाटे : राजापूर तालुक्याच्या महामार्गावरील पश्चिमेकडील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून जैतापूर आरोग्य केंद्राकडे पाहिले जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पुरेशी सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. काहीवेळा तर रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्नदेखील उपस्थित होतो.

जैतापूर आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ३८ गावे येत असून, सहा उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रातील दोन्ही डॉक्टरांची पदे भरली गेली आहेत; मात्र पाच आरोग्य सेविकांच्या मंजूर पदांपैकी केवळ एकच पद भरलेले असून, ३८ गावे, सहा उपकेंद्रे आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार एका आरोग्यसेविकेवर आणि तीन समूह आरोग्य अधिकाऱ्यांच्या भरोसे सुरू आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी पदे रिक्त असून, याचा परिणाम संपूर्ण यंत्रणेवर होत आहे. आरोग्य केंद्रावर सोलर यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत ती बंद असल्याने आणि त्यातच कायम विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने अधिकारी रुग्णांवर उपचार करू शकत नाहीत. पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक लोकं शेतीच्या कामात गुंतले आहेत. अनेक ठिकाणी सर्पदंशसारखे प्रकार तसेच साथीच्या रोगांची शक्यता आहे. 

सागरी महामार्गावर अनेक वेळा अपघात घडतात. दोनच दिवसांपूर्वी नाटे कोकरीवाडी येथील स्वरांजली पावसकर या सतरा वर्षीय युवतीला रात्री एकच्या सुमारास सर्पदंश झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम धारतळे आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जैतापूर आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, यामध्ये जवळपास दोन ते अडीच तासांचा कालावधी उलटला होता. त्यातच कहर म्हणजे कोणीही कर्मचारी नसताना डॉक्टर आणि एक पर्यवेक्षक यांनी उपस्थित राहत मोबाईलच्या प्रकाशात तिच्यावर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग आणि अन्य सेवा सुविधांच्या अभावामुळे धोका न पत्करता १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

राजापूरचे आ. राजन साळवी यांच्या निदर्शनास ही बाब तात्काळ आणून देण्यात आली. त्यांनीही औचित्याचा मुद्याद्वारे हा प्रश्न उपस्थित केला असून, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी देखील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, रिक्त पदे भरली गेली नसल्याने पुरेसा कर्मचारी वर्ग देता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

डॉक्टरांचा पत्ता शोधण्यापासून सुरुवात
वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या सर्व निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अन्यत्र राहावे लागत आहे. एकही पुरुष परिचर नसल्याने रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रात कोणीही नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणी रुग्ण आल्यास अधिकारी आणि कर्मचारी कुठे राहतात, हे सांगण्यासाठी किंवा त्यांना बोलाविण्यासाठी कोणी नसते. डॉक्टरचा पत्ता शोधण्यातच रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 10/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow