Konkan Railway : पेडणे बोगद्यातील पाणी, ट्रॅकवर साचलेली माती काढण्यात कोरेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश; कोकण रेल्वेची वाहतूक १६ तासानंतर पूर्ववत

Jul 11, 2024 - 09:48
 0
Konkan Railway : पेडणे बोगद्यातील पाणी, ट्रॅकवर साचलेली माती काढण्यात कोरेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश; कोकण रेल्वेची वाहतूक १६ तासानंतर पूर्ववत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील टनेलमध्ये रुळांच्या बाजूला जमिनीखालून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक तब्बल १६ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. शंभरहून अधिक मजूर, २५ सुपरवायझर्स, अभियंते, कन्सल्टंट यांच्या अथक परिश्रमातून बुधवारी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे.

मडुरे ते पेडणे दरम्यान जोरदार पावसामुळे बुडबुड्यांच्या स्वरूपात रुळांच्या बाजूला जमिनीखालून मोठ्या प्रमाणावर चिखलमिश्रित पाणी येऊ लागल्यामुळे खबरदारीची उपायोजना म्हणून कोकण रेल्वेने बुधवारी पहाटेपासून रेल्वे सेवा बंद ठेवली होती. पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे रेल्वे सेवा खंडित झाल्यामुळे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. खंडित झालेली सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच बुधवारी रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वे कडून कळवण्यात आले.

पेडणे बोगद्यातील घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेससह जवळपास १९ गाड्या कोकण रेल्वेने रद्द केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्याआधी रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या आहेत. बुधवारी रात्री ८.३५ नंतर कोकण रेल्वेची बंद पडलेली वाहतूक पूर्ववत झाल्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
 
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow