IND vs ZIM : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडसमोर झिम्बाब्वेची धूळदाण, भारताचा 23 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

Jul 11, 2024 - 10:08
 0
IND vs ZIM : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडसमोर झिम्बाब्वेची धूळदाण, भारताचा 23 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

शुभमन गिलच्या नेतृत्वातील युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेची धूळदाण उडवली. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा संघ 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भेदक मारा कऱणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सुंदरने 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले, त्याने 49 धावांची खेळी खेळली. यशस्वी जैस्वालनेही 36 धावा करत टीम इंडियाला 182 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यातून यजमान सावरलेच नाहीत.यजमान झिम्बाब्वेने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला वेस्ली माधवेरे केवळ 1 धावा काढून बाद झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण विजय मिळवून देऊ शकला नाही. रझा फक्त 15 धावा काढून बाद झाला.

डिऑन मायर्सची झुंज -

एकवेळ झिम्बाब्वेने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, पण इथून क्लाइव्ह मदंडे आणि डिऑन मायर्स यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनी मोठी भागिदारी करत भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. दोघांनी अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांना लक्ष्य केले. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 7 षटकांत 5 विकेट्सवर 39 धावांवरून 15 षटकांत 110 धावांवर आणली. पण त्यानंतर झिम्बाब्वेची डेथ ओव्हर्समध्ये घसरगुंडी झाली. मदंडेने 26 चेंडूत 37 धावा केल्या आणि मायर्सने त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मायर्सने 49 चेंडूत 65 धावा केल्यानंतर नाबाद माघारी परतला, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

खलील अहमदने सामना फिरवला -

अखेरच्या 5 षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी 73 धावांची गरज होती. मायर्स आणि मदंडे यांचा जम बसला होता. ते ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, त्यामुळे हे लक्ष्य सहज गाठता येईल असेच वाटत होते. पण 16 व्या षटकात खलील अहमदने फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. उर्वरित काम आवेश खानने 18 व्या षटकात पूर्ण केले. आवेश खान याने त्या षटकात फक्त 6 धावा दिल्या, त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. सुंदरने 4 षटकांमध्ये तीन बळी घेतल्या. आवेश खानने 2 तर खलील अहमदने 1 विकेट घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow