प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार

Jul 11, 2024 - 14:46
Jul 11, 2024 - 14:50
 0
प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार

पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथील पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे.

प्रशांत किशोर २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंतीदिनी अधिकृतपणे एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत.

प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण बिहार पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनेक सभा घेऊन त्यांनी बिहारमधील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर ते आता बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल.

प्रशांत किशोर यांची मुख्य ओळख निवडणूक रणनीतीकार अशी आहे. मात्र, २०२१ मध्ये ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जाहीर केले होते की, ते यापुढे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. २ ऑक्टोबर २०२२ रोजी औपचारिकपणे राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहारमध्ये यात्रा काढण्याची घोषणा केली होती.

पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी जनसुराजची स्थापना केली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पश्चिम चंपारण्य भागातून आपल्या यात्रेस सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी आजतागायत पाच हजार किमी चालल्याचा दावा केला आहे. त्यांनी बिहारचे १४ जिल्हे चालून, तर १० जिल्हे वाहनाने पिंजून काढले आहेत. यानंतर आता प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमधील सर्व २४३ जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशांत किशोर हे मुस्लिम मतांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ७५ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच, आपल्या मुलांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा, असे आवाहन प्रशांत किशोर बिहारमधील जनतेला करताना दिसतात. खासकरून दलित आणि मुस्लिमांनी जात आणि धर्माच्या आधारावर मतदान करू नये, असेही आवाहन प्रशांत किशोर यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, बिहारच्या राजकारणामध्ये १९९० पासूनच सामाजिक न्यायाचा मुद्दा प्रभावी राहिला आहे. त्यातून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी, तसेच विद्यमान मुख्यमंत्री व जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांचा उदय झाल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही फारसे सुधारलेले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी जेडीयूमधून आपली राजकीय इनिंग सुरू केली होती. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये क्रमांक दोनचे स्थान दिले, पण लवकरच ते दोघेही वेगळे झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow