संगमेश्वर : माभळेत आषाढी उत्सवाची १९१ वर्षांची परंपरा

Jul 17, 2024 - 14:59
Jul 17, 2024 - 15:04
 0
संगमेश्वर : माभळेत आषाढी उत्सवाची १९१ वर्षांची परंपरा

रत्नागिरी : संगमेश्वरजवळील माभळे या गावात श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात गेले १९१ वर्षे आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होत आहे. हा उत्सव गावातील एकोप्यासाठी प्रसिद्ध आहे. मूळ कार्यक्रमात, रूपरेषेत बदल न करता काळानुरूप काही बदल झाले. उत्सवात पुरुषांसोबत महिलाही हिरिरीने सहभागी होतात. पूर्वी हा उत्सव बारा दिवस चाले, आता पाच दिवसांचा होतो, उत्सवात आरत्या, देवे, मंत्रपुष्पांजली, दोन भोगत्या आणि कीर्तन असा कार्यक्रम होतो.

श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना कीर्तनकार महादेव सदाशिव भिडे माभळे यांनी केली. १८३४ मध्ये या उत्सवाची सुरवात झाली; परंतु हा उत्सव फक्त भिडे कुटुंबीयांपुरता नाही तर माभळे गावाचा उत्सव म्हणून साजरा होतो. सुरवातीला मंदिर म्हणजे फक्त मूर्ती, गाभारा, सभामंडप होता नंतर कौले, रंगमंच, मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकसहभागातून राहिलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत गेली. आषाढ शुद्ध अष्टमीपासून उत्सवाला सुरुवात होते. मंदिरात दरमहा एकादशीला भजनाचा कार्यक्रम होतो.

भिडे यांच्या घरातच आठ पिढ्या कीर्तनकार त्यामध्ये बहुतेक सर्वच कीर्तनकार होते. संस्थापक महादेवबुवा भिडे हे सुद्धा कीर्तनकारच होते. गावोगावी कीर्तनकला सादर करणारे त्या वेळचे नामवंत कीर्तनकार उत्सवाव्यतिरिक्त मंदिरात येऊन कीर्तनसेवा करत असत. यामध्ये करवीर पीठाचे होऊन गेलेले शंकराचार्य कऱ्हाडकर बुवा व त्यांचे वडील, हरीबुवा काणे गणेशवाडीकर व त्यांचे चिरंजीव, (के.) माधवबुवा आठल्ये, औरंगाबादकर बुवा, देवरूखचे कुवळेकर महाराज, कानिटकर बुवा आदी नामवंत युवा कीर्तनसेवा करून गेले आहेत. दुपारच्या कीर्तनाची निःस्वार्थी सेवा नांदिवडे येथील (कै.) गोपाळकृष्ण बिवलकर, कीर्तनकार नाना जोशी, विनायकबुवा पाटणकर यांनीही निस्वार्थपणे सेवा केली. उत्सवातले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टमीला सर्वांकडूनच भाजणीचा वडा व पावट्याची उसळ, नवमीला फराळ म्हणजे बटाटापोहे व लाडू, दशमीला गावजेवण असते.

रामकृष्णाचा संवाद
उत्सवातील दहीकाल्याच्या कीर्तनाच्या शेवटी राम व कृष्ण यांचा संवाद असतो. रामाची भूमिका भिडे कुटुंबीयांपैकी भट घराण्याकडे तर कृष्णाची भूमिका भिडे कुटुंबीयांपैकी बुवा घराण्यात असते. दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, हा उत्सव कोणाचा, रामाचा का कृष्णाचा, असा संवादात्मक कार्यक्रम असतो. दहीकाल्याच्या आधी ताक घुसळणाऱ्या गवळणीचे सोंगही प्रभाकर भिडे यांच्या कुटुंबीयांकडे पूर्वापार आहे. ती प्रथा आजही चालू आहे.

देवाकडून वर घेण्याची प्रथा
पूर्वी उत्सवात नाटक सादर व्हायचे. संवादरूपी आवाहनातून उत्सव निर्विघ्नपणे पार पड़ावे यासाठी श्री गणपती सरस्वती पूजनाने देवाकडून वर घेऊन कार्यक्रमाची सुरवात करायची अशी येथील प्रथा आजही सुरू आहे. विठ्ठल मंदिराशेजारील मनोहर भिडे यांच्या घराचा पूर्वापार या उत्सवामध्ये मोठा सहभाग आहे. या उत्सव कालावधीत त्यांचे घर आणि देऊळ ही जवळजवळ एकाच झालेली असतात. कोणती वस्तू लागली तरी कोणी धावत त्यांच्या घरी जातो आणि घेऊन येतो.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow