चिपळूण : पूर ओसरल्यानंतर गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच

Jul 17, 2024 - 10:59
Jul 17, 2024 - 15:16
 0
चिपळूण : पूर ओसरल्यानंतर गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच

 चिपळूण : गेल्या दोन दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील काही भागात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. सोमवारी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यानंतर पूर ओसरला आणि चिपळूण नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

मात्र, यावेळी गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच आढळून आला. चिपळूण नगर परिषदेतर्फे वेळोवेळी प्लास्टिक बाटल्या गटारे, नदी, परहे यामध्ये टाकू नका, असे आव्हान करण्यात येते. तरीही चिपळूणमधील काही नागरिकांनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबत जागरूक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील चिंचनाका, वडनाका, रंगोबा साबळे रोड, भाजी मंडई परिसर, अनंत आईस फॅक्टरी, शंकरवाडी मुरादपूर रोड आदी परिसरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

सोमवारी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतल्यानंतर पूर ओसरला मात्र. काही भागात रस्त्यांवर चिखल आले तर गटारे तुंबल्याचे पहावयास मिळाले. यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले, यांच्या मार्गदर्शना खाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते सर्व मुकादम व सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. पूरग्रस्त रस्त्यांवरील सफाई कर्मचाऱ्यांनी चिखल बाजूला केला तर गटारे मोकळी करत असताना या गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खर्च आढळून आला. एकीकडे प्लास्टिक बाटल्या मोकळ्या जागेत अथवा गटारे नदी, परे यामध्ये टाकू नका, असे चिपळूण नगरपरिषद प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात येते.

मात्र, या आवाहनाला काही नागरिकांकडून केराची टोपली दाखवल्याचे या प्रकरणावरून दिसत आहे. प्लास्टिकच्या बाटल्यामुळे पर्यावरणाला काय फटका बसतो किंवा दुष्परिणाम काय होतात ? हे सर्वांनाच माहित आहे. तसेच प्लास्टिक बाटल्यांमुळे ड्रेनेज तुंबते हे माहिती असून देखील काही नागरिकांकडून प्लास्टिक बाटल्या गटारांमध्ये टाकण्याचे सर्रास प्रकार घडत असल्याने जागरूक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा असले प्रकार थांबले पाहिजेत. प्लास्टिकचा कचरा मोकळ्या जागेत किंवा गटारे, नदी, परहे मध्ये टाकणाऱ्यांवर चिपळूण नगर परिषदेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow